बुधवार, २७ जून, २०१८

किस्सा...

पारनेर-नगर एसटी मधील एक मनाला भिडलेला किस्सा... एकदा वाचाच...

दिनांक १९ जून २०१८ ची घटना आहे.दुपारी दीड वाजताच्या पारनेर(सुपा मार्गे) नगर एस टी गाडीने नगरला येत होतो. गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती.गाडी केडगावच्या जवळ आली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले.गाडी थांबली गाडीत चार पाच इसम चढले. ते एसटीचे अधिकारी होते त्यांनी प्रवाश्यांची तिकिटे चेक करायला सुरुवात केली.सर्व प्रवाश्यांनी पटापट तिकिटे काढून दाखवली.त्यातील एक अधिकारी माझ्या सीटजवळ आला मीही तिकीट दाखवले.त्यांनी माझ्या बाजूच्या व्यक्तीला तिकीट म्हणून विचारले. बाजूचा व्यक्ती इन शर्ट केलेला. पायात छान बूट असलेला एक रुबाबदार तरुण होता.त्यांनी तिकीट विचारताच तो तरुण स्टाफ म्हणाला आणि गप्पा झाला.अधिकाऱ्याने त्या तरुणाला वरपासून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळला व स्लिप दाखव म्हणाला. तरुणाने स्लिप दाखवली.स्लिप बघून त्या अधिकाऱ्याला काय खटले काय माहीत.तो म्हणाला काय जहागिरदाराची औलाद आहे का? बापाची गाडी असल्यासारखा फिरतो? आम्ही आल्यावर साधं उठून उभा राहता येत नाही का? असे म्हणून सर्व प्रवाश्यांसमोर आपल्याच स्टाफचा असा आगे तुगे बोलून अपमान करणारा अधिकारी मी पहिल्यांदा पहिला.एवढ्या लोकांत अपमान होत असून सुद्धा त्या तरुणाने पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून त्या अधिकाऱ्यांची माफी मागितली.परंतु अधिकाऱ्याने आपली मुजोरीची भाषा तशीच सुरू ठेवली. त्या कर्मचाऱ्याला कार्यवाहीची धमकी देऊन त्याच्या स्लीपवरील नाव लिहून नेले.व तणतणत निघून गेला.
      मी विचार करू लागलो की त्या तरुणाचे नेमके काय चुकले असावे बरे म्हणून एवढा अपमान होऊनही त्यानेच माफी मागितली.म्हणजे आजही वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव प्रत्येक क्षेत्रात आहे.आजही वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ कर्मचाऱ्याला गुलाम म्हणूनच वागवतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी त्या तरुणाला त्याचे नाव विचारले त्याने अतिशय नम्रपणे आपले नाव सांगितले. बहुधा तो ड्युटी संपवून घरी निघाला असावा.त्या अधिकाऱ्याचेही नाव मी जाणून घेतले.
अधिकाऱ्याचे नाव : सुभाष गवळी
तरुणाचे नाव : पारनेर डेपो मध्ये कंडक्टर असलेले अभिमान गायकवाड होय.

बघा यातलं कुणी तुमच्यात ओळखीचं आहे काय किंवा तुम्हीही त्या एसटीचे प्रत्यक्षदर्शी प्रवासी आहात काय.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)

मो.नं.7028255007.

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स...

      काही वेळा माणूस अति उत्साहाच्या भरात असे काही कृत्य करायला जातो की तो सर्वांसमोर तोंडावर कधी पडतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.एखाद्याला कमी लेखण्याच्या व पाय खेचण्याच्या या रस्सी खेच मध्ये त्याच्या कमरेचा चुराडा कधी झाला हे न कळण्या इतका बेभान होणारा त्याच्यासारखा अति शहाणा तोच असतो.काहीही कारण नसताना स्वतःचे नाकर्तेपण लापवताना त्याची तारेवरची केविलवाणी कसरत बघून खरंच त्याची कीव येते व हसूही... मी म्हणतो असे का व्हावे? कितीही रक्तबंबाळ झाले तरी हा आटापिटा कशासाठी आणि कोणासाठी?... हे फक्त नावासाठी होत असेल तर ते तुम्हाला अशा मार्गाने कधीच शक्य होणार नाही.त्यासाठी अंगात तशी धमक असावी लागते.जवळ आलेली माणसं तोडण्याचा नव्हे जोडण्याचा गुण असावा लागतो.तोंडात मधाळ भाषा असावी लागते.तेव्हा दूर असलेली माणसं जवळ येतात.आपुलकीने जवळ घेतात.आणि यासाठी गरज असते ती आपल्यातील कर्तृत्व गुणाची आणि तो असा हिसकावून किंवा दिखावा करून मिळत नसून तो रक्तात असावा लागतो, त्याच्यासाठी माणसाबरोबर एकरूप व्हावं लागतं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्या लागतात... म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात "तेथे पाहिजे जातीचे, हे काम नोहे येरा गबाळ्याचे."

©शब्दांकन : पाटोळे R.B.
मो.नं.7028255007.

मंगळवार, १५ मे, २०१८

रक्ताळलेल्या जखमा

रक्ताळलेल्या जखमा...
एक भयाण सत्य.....

उन्हाळ्याचे दिवस होते.सर्वत्र नांगरट होऊन जमिनी ऊन खात पडल्या होत्या. त्या प्रचंड व अथांग जमिनीची उलथापालथ  होऊन काळीशार ढेकळ माणसाच्या धडावीना मुंडक्या सारखी भासत होती.त्यातच वर्षभर तग धरून असलेली झुडपं मुळासकट उन्मळून पडली होती.उन्हाच्या धगीने अर्धवट आंबट ओल्या झुडपाच्या मुळ्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.
     दुपारची वेळ सूर्य नारायण माथ्यावर आग ओकत होता. त्याच्या भयाण झळा अंगाची लाही लाही करत होत्या.अश्यातच भीमा आणि कांता डीष्कळच्या शिवारातलं ते काळशार नांगरटीचं रान तुडवत चालले होते.अंगात पैरण, पायजमा व पायात पायताण घातलेला भीमा ऐटीत चालत होता.मधेच ढेकळावरून पाय घसरून गुढग्यात लवत होता.त्याच्या पुढे काही अंतरावर चार ठिकाणी फाटलेलं धडूतं अन् सात ठिकाणी ठिगळं लावलेलं झंपर घातलेली आनवाणी कांता बिगिबिगी चालत होती. तापलेल्या ढेकळाचा चटका तळपायातून मस्तकात घुसत होता. प्रत्येक पावलागणिक तिचा जीव खालीवर खालीवर होत होता. कारण भीमा एक नंबरचा बेरकी माणूस होता. कपाळाचे बाशिंग सुटले तसे कांताला पाण्यात बघणारा भीमा... कधी रुद्र रूप धारण करेल आणि त्या महारुद्रालाही लाजवेल हे त्या शंभू महादेवालाही न उलगडणारे कोडेच होते. म्हणून कांता लगबगीने आपल्या माहेरचा उंबरा जवळ करीत होती. आणि त्यासाठी भीमाने अडवळणाची वाट निवडली होती.
     कांता पुढे आणि भीमा मागे असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. दहा एकराचे नांगरटीचे उभे रान आनवाणी पायाने तुडवायचे म्हणजे कांतासाठी जीव तळहातावर घेऊन चालण्याचे ते एक दिव्यच होते.
     भीमाच्या मनात मात्र एक भलताच सैतान जन्म घेत होता. झपझप पावलं टाकत चालणारी कांता प्रत्येक पावलागणिक त्याच्या छाताडावर थयथयाट करून नाच करत असल्याचा भास त्याला होत होता.आणि या विचाराने त्याचा जीव कासावीस झाला होता.त्याने कांताला आवाज दिला."कांते थांब".या शब्दाबरोबर कांताच्या मनात भीतीचा गोळा उभा राहिला. तिला दरदरून घाम फुटला. आता काय? आता आपला आवतार संपला हा पक्का विचार कांताच्या मनात घर करून गेला. तिची चाल मंदावली तसा भीमा तिच्या आंगचटीला येऊन थांबला. कांताकडे बघून निमिशभर हसला आता मात्र कांताची गाळण उडाली. त्याचे ते भेसूर हसणे म्हणजे त्याच्यातील सैतान जागा झाल्याची जणू ती सावध घंटाच होती. परंतु त्या भयाण रानात कांता काहीच करू शकत नव्हती. जे घडेल ते निमूटपणे सहन करण्याची व आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तिने आपल्या मनाची तयारी केली.
     भीमा गपकन खाली वाकला. कांताला काही कळायच्या आत तिच्या पायाखालची बाभळीची एक लवचिक व मजबूत मुळी उचलून त्याने हातात घेतली. आणि कांताला फर्मान सोडलं."चल आता."
कांता पुन्हा चालू लागली. चार पाच पावलं चालली असेल नसेल तोच एक तिखट आणि सणसणीत फटका सप् दिशी तिच्या उघड्या घामेजलेल्या पाठीत बसला तशी कांता कळवळली "आय गं मेले" म्हणून जिवाच्या आकांताने ओरडली. पण तिची ती आर्त किंकाळी त्या भयाण नांगरटीच्या रानात काळ्या ढेकळात विरून गेली. पुन्हा अजुन एक फटका... फटक्यांवर फटके बसू लागले, वळावर वळ उठून अंग सुजू लागले.अंगावर उठलेल्या प्रत्येक वळावर घामाच्या धारा आपला ताबा घेऊ लागल्या.खारट घामाच्या धारा जखमेवर मीठ चोळावे तदवत कांताच्या देहाला झोंबु लागल्या अगणिक वेदनांच्या लहरी कांताच्या शरीरात संचारत होती. तिचा थरकाप होत होता. कांता आपल्या आंगावरचं चार ठिकाणी फाटलेलं धडूतं सावरत आपली लाज व आईबापाची इज्जत झाकण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती.आणि भीमा प्रत्येक फटक्या सरशी एक वेगळाच आसुरी आनंद घेत होता.आईचं घर जवळ येई पर्यंत कांताच्या देहावर गुंजभर जागा उरली नाही की जिथं तिला ती बाभळीची मुळी स्पर्शून गेली नसेल.आणि घाम झोंबला नसेल.
       रक्त बंबाळ झालेली कांता कशीबशी आपल्या आईच्या अंगणात पोहोचली अन धाड्दीशी दारातच कोसळली. भीमा आंगणातल्या दगडावर ठिय्या मांडून बसला. कांताची अवस्था बघून तिच्या आईचं काळीज सोलवटुन,पिळवटून निघालं. हृदयाला न कळत पीळ बसला.आणि ती माय माऊली आपल्या त्या सासुर वाशीण हरणीला बघून कासावीस झाली. टपटप टीपं गाळू लागली. ती क्षणात तांब्याभर पाणी घेऊन आली. तसा भीमाने तांब्या पायाने लाथाडला आणि तो गरजला "मामी आवं काय रितभात हाय का न्हाई, जावई हितं बसल्याला असताना तुमी लेकीची काळजी कारायलाव व्हय? आदी माझ्या करता पाणी आणा." भीमाच्या बोलण्याने कांताची आई निशब्द झाली होती. लेकीचं हत्ती सारखं ते मूर्च्छित पडलेलं धुड बघून तिच्या हृदयात मायेचा कंप फुटला होता. अश्रुंचे उमाडे भरून आले होते. कांता म्हणून केविलवानी हाक तिच्या कंठात आडकली होती. पण भीमा पुढं तिचा काही इलाज चालत नव्हता. तिची आईची माया भिमापुढे हतबल झाली होती.
     खरंच मनुष्य(पुरुष) देह इतका पाषाण हृदयी असू शकतो  का? या आयुष्यभर न सुटलेल्या कांताबद्दल भीमाला काहीच आपुलकी वाटत नसावी का? कांताकडून काय चूक झाली असेल म्हणून भीमा तिला एवढ्या डागण्या देत असावा? आई जवळ असून सुद्धा आपल्या कोकराला जवळ का घेऊ शकत नव्हती? काय म्हणावे काय या नियतीला... का खेळत असेल ती असे खेळ?
      मन हेलावून टाकणारे असे सत्य पुढे आल्यावर मग मन आणि मेंदू आगदी सुन्न, सुन्न आणि केवळ सुन्न होऊन जातात.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)
मो.नं.- 7028255007.

शनिवार, १२ मे, २०१८

रक्ताळलेली रात्र...

मनावरील ओरखडा...

       रात्री बारा एकाची ची वेळ होती.मला पुण्याला अर्जंट जायचे होते म्हणून मी सोलापूर हायवे वरील शेठफळ चौकात  गाडीची वाट बघत उभा होतो.पंढरपूर तालुक्यातील रोपळे बु. हे माझे गाव.मी आईला भेटायला गावी गेलो होतो.आई मला म्हणत होती "आरं रात लय झालीय, सकाळच्याला जा.गाडी न्हाय मिळायची." पण मी आईचे एक न ऐकता निघालो होतो.रात्र बरीच झाली होती.सर्वत्र निरव शांतता होती.मधूनच दूरवर ट्रकच्या हॉर्नचा आवाज ती शांतता भंग करत होता आणि मनुष्याच्या अस्तीत्वाची जाणीव करून देत होता.पूर्वी या चौकात एकही लाईटचा खांब नव्हता. जशी वेळ ढळत होती तसं माझ्या मनात किर्रर्रर्र रात कीडे ओरडल्यासारखा आवाज उगाचच गोंगाट करत होता.तरीही त्या भयाण रात्री मी गाडीची वाट बघत उभा होतो.
     सोलापूरकडून येणारी एक ट्रॅव्हल्स अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली.मला काही कळायच्या आत माझ्या मागून एक जण आला आणि गाडीत शिरला.माझ्या काळजात धस्स झालं.तो माझ्या पाठीमागे त्या पत्र्याच्या हॉटेल मध्ये मुरकूटं होऊन झोपलेला व्यक्ती होता.बहुधा तो ट्रॅव्हल्स वाला त्या व्यक्तीला ओळखत असावा असा माझा अंदाज होता, तो नंतर खरा ठरला.त्याच्यासाठीच ती ट्रॅव्हल्स तिथे थांबली होती. चढलेल्या व्यक्तीने हळूच विचारणा केली."बशीर पिछे एखाद सीट खाली है क्या रे."
बशीर : नहीं यार भाईजान, लेकीन पुरा केबिन खालीच है क्या हुवा?
भाईजान : कुछ नहीं यार ये लडका बहुत देरसे खडा है यार पुना जानेका है इसको.
बशीर : बस क्या भाईजान लेलो ना यार उसमे पुछनेकीं क्या बात है.
भाईजान : चलो भाई पुना जाना है ना तुमको.
मी हो म्हणालो आणि झटकन बसमध्ये चढलो.मला हायसं वाटलं.मी बसलो आणि मनात सुरू झाले ते विचार चक्र माणसाच्या माणुसकी बद्दल.
     त्या दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.बशीरचे नुकतेच चार दिवसांपूर्वी लग्न झाले होते. बायकोच्या हाताची आजून मेहंदीही उतरली नव्हती आणि हा बशीर नव्या नवेली दुल्हनला घरी सोडून ड्युटीवर आला होता.व त्याला मालकाने पुण्याची ट्रिप दिली होती.चार रात्रीपासून झोप पुरी झाली नसल्याने आपल्याला आराम करता यावा म्हणून आपल्या ड्रायव्हर मित्राला बोलावले होते.
      गाडी टेम्भुर्णीमध्ये बार्शी चौकात चहा पिण्यासाठी थांबली.चहा पाणी झाल्यावर बशीर मागच्या शीटच्या वर असलेल्या बेडवर झोपण्यासाठी गेला व भाईजान गाडी चालवू लागला.गाडी रेग्युलर स्पीडपेक्षा जरा स्लो चालत होती.पण रात्रीची वेळ असल्याने ते जाणवत नव्हते. भाईजानची ड्रायव्हिंग वर करडी कमान असल्याची जाण त्यावेळी होत होती.कारण आगदी सफाईदार पणे अप्पर डीप्पर देत तो गाडी चालवत होता.
     गाडीने भिगवण चे रेल्वे फाकट पास केले आणि अचानक पुण्याकडुन भरदाव वेगात आलेल्या एका ट्रकने ट्रॅव्हल्सला जोराची डॅश दिली व संपूर्ण ड्रायव्हर साईट घासत कुणाच्याही लक्षात येण्या आधी तो ट्रक ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर साईटचा आरसा तोडून भरदाव वेगात आला तसा निघून गेला.ट्रॅव्हल्सला चांगलाच हादरा बसला.गाडीत आरडाओरडा सुरू झाला.
       भाईजानने गाडी रोडच्या खाली घेतली व उभी केली.तसे आतले सारे प्रवासी खाली उतरले व काय झाले हे विचारू लागले.भाईजान व मीही खाली उतरलो.झाला प्रकार सर्वांना सांगितला. एक दोन प्रवासी सोडले तर बाकीचे समजूतदार होते. त्यांनी जे समजायचे ते समजून घेतले व पुन्हा आपापल्या जागेवर जाऊन बसले. भाईजानने गाडीची घासलेली बाजू चेक केली व अचानक त्याला बशीरची आठवण झाली." साला एवढा मोठा झटका बसला गाडीला हा बशीर उठला कसा नाय यार". त्याने माझ्याकडे बघितले... मी नुसतेच ओठ उरफाटे केले.
       भाईजान लगेच केबिनमध्ये चढला.मीही त्याच्या पाठोपाठ चढलो... समोरचे दृश्य पाहून मी तर एकदम शॉक झालो राव.भाईजान तर बेशुद्धच पडला. ज्या बाजूने ट्रक घासून गेला त्या बाजूला बशीरचे डोके होते.तिथून लालभडक रक्ताची धार वाहत होती. केबिन मधल्या मंद प्रकाशातही हे स्पष्ट दिसत होते.मागचे शीट तर रक्ताने पूर्ण भरले होते. मी ताबडतोब पेसेंजरला मदतीसाठी हाक दिली.सर्वजण धावून आले.एकदोघांनी बशीरला चाचपून बघितले पण तो कधीच थंडगार व शांत झाला होता.एकाने भाईजानच्या तोंडावर पाणी मारले तसा तो शुद्धीवर आला.बशीर बशीर म्हणून बशीरला मिठ्या मारू लागला.काय झालं रे देवा माझ्या बशीरला.काय झालं?... बशीर ये बशीर? आरे काय होऊन बसलं रे हे... आता काय सांगू मित्रा तुझ्या बायकोला?... बोलना बशीर?... भाईजान धायमोकलून केविलवाणा आक्रोश करत रडत होता... थोड्याच वेळात पोलीस गाडी आली.पंचनामा झाला... बॉडी पी.एम. साठी ताब्यात घेण्यात आली... माझी तर साली पाचावरच धारण बसली यार.प्रत्येक्षात असा मानवी रक्ताचा तो लोट बघण्याची व माझ्यासमोर माणूस दगावण्याची ही पहिलीच वेळ होती.
      मी विचार करू लागलो कसा मेला असेल बरं हा बशीर... त्या भरदाव वेगात येणाऱ्या ट्रकने ज्यावेळी ट्रॅव्हल्सचा आरसा फोडला त्यावेळी तिचाही आरसा फुटला असणार त्या आरशाचा रॉड बशीरच्या खोपडीत शिरला असावा व ती गाडी इतकी घासून गेली असल्याने त्या रॉडने बशीरची खोपडी फाटली असावी व जागीच त्याचा मृत्यू झाला असावा... असा माझ्या चंचल मनाने अंदाज बांधला.
      पण आजही ती घटना आठवली की माझे मन खिन्न होते. व त्या बशीरच्या निष्प्राण देहाभोवती घिरट्या घालू लागते. कधी हे चंचल मन दूर दूर त्या सोलापूरच्या गल्ली बोळात जाऊन ती हाताची मेहंदी न उतरलेल्या बशीरच्या बायकोचा शोध घेऊ लागते.जो कधीच पूर्णत्वास येऊ शकत नाही.व तिचे पुढे काय झाले असेल याचा वेडा अंदाज बांधू लागते.भाईजान या धक्क्यातून सावरला असेल का?... बशीरचे आई, वडील, बहीण, भाऊ कोणी घटनास्थळी आले असेल का? आले असतील तर त्यांच्या मनातील भावना कशा व्यक्त झाल्या असतील त्यांचा आक्रोश कसा झाला असेल?
     या आशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मी आजही न कळत शोधत आहे. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उगाचच चाचफडत हे सर्व विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे. त्या दिवसापासून आज पर्यंत मी एकटा कधीच अंधाऱ्या रात्री गाडीची वाट पहात उभा राहिलो नाही... कारण माझ्या समोर उभा राहतो तो लग्नाच्या हळदीने माखलेला व रक्ताच्या लालीने रंगलेला छिन्न विच्छिन्न खोपडीचा बशीर... बशीर... बशीर.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)
मो.नं.7028255007.

शुक्रवार, ११ मे, २०१८

माझे विचार...

निशब्द प्रेम...

निशब्द प्रेम...

      त्या निर्जन स्थळी काळोख्या अंधारात कसलीशी कुजबूज कानावर पडली आपसूकच माझी पावले त्या आवाजाच्या दिशेने वळू लागली. मी जसजसा त्या आवाजाच्या जवळ जाऊ लागलो तसा तो आवाज जास्तच स्पष्ट जाणवू लागला. माझी पावले क्षणभर स्थिरावली आता मी एका जाग्यावर स्थिर थांबून त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो.बहुतेक माझ्या येण्याची चाहूल लागल्याने काही क्षण तो आवाज बंद झाला होता.मी पुन्हा थोडे पुढे सरकलो... आवाजाच्या दिशेने निरखून बघितले... बहुधा माझी नजर आता त्या अंधाराशी एकजीव झाली होती.त्या काळोखात ती काहीतरी शोधत होती... समोरच्या कोपऱ्यात मला कासलीसी हालचाल जाणवली.मी आता डोळे फाडून पाहू लागलो.पुन्हा पुन्हा पाहू लागलो... समोरचं दृश्य पाहून मनात चर्र झालं.एक कुत्री रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती.आणि तिचं तान्ह पिलू तिच्या सडाला(स्तनाला)चिटत होतं... त्याच्या त्या चिटण्याचा चूक.. चूक आवाज त्या अंधारात मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी क्षणभर विचार केला... काय झालं असेल बरं त्या कुत्रीला? बहुतेक अंधाराच्या त्या गर्ततेत एखाद्या सुसाट जाणाऱ्या मोटार सायकल वाल्याने त्या पिलांच्या आईचा घात केला असावा... आपली आई निवांत झोपली आहे असं समजून ते निरागस पिलू  जगाची पर्वा न करता मनसोक्त स्तनपान करत होतं. त्याला उद्याची चिंता नव्हती. आज त्याची आई मेल्यानंतरही क्षणभर का होईना पण आपल्या पिलाला कुशीत घेऊन पाजत होती... लगेच माझ्या मनात विचार आला खरंच यालाच म्हणतात का आई? जी स्वतःच अस्तित्व संपवून आपल्या पिलाचं पोट भरत होती.
     मी पट्कन त्या ठिकाणावरून झपझप पावलं टाकत घर जवळ केलं. घराच्या कडीला हात लागला तसा आतून आवाज आला... "थांबरे उघडते" क्षणात दार उघडलं गेलं ती आई होती...समोर खाटेवर बायको गाढ झोपली होती बहुतेक ती दमली असावी. मुलगा त्याच्या खोलीत आडवा झाला होता. माझी आई खाली फरशीवर चटई अंथरूण माझ्या वाटेकडे डोळे लावून होती. मी आईला विचारले "आगं आई मी तर आवाजही दिला नाही,आणि तरीही तुला कसं कळलं गं मीच आहे म्हणून दुसरं कुणी असतं तर"... आई हसली आणि म्हणाली "बाळा नऊ महिने या उदरात वाढवलंय तुला, हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून तासनं तास जोजवलंय... माझ्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन जोडलं गेलंय तुझ्या हृदयाशी... माझ्या बाळाची चाहूल लागताच आजही माझ्या हृदयाची स्पंदने जोराने वाढतात आणि सांगतात आई तुझं कोकरू आलं बघ". मी निशब्द होतो. फक्त हृदयातून "आई" हे दोनच शब्द बाहेर पडले.आणि मी अलगद त्या माऊलीच्या कुशीत शिरलो. "आई गं... माझी आई".

"आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी"

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP).मो.नं.7028255007

मंगळवार, ८ मे, २०१८

कलासक्त अवलिया

कलासक्त अवलिया... रफिक शेख.

   अहमदनगर जिल्यातील नगर तालुका स्थित जेऊर हे माता बाईजाबाईंच्या आशीर्वादाने पावन झालेले एक गाव. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावात अनेक जाती धर्माचे लोक आगदी गुण्या गोविंदाने नादतांना दिसतात.
    याच गावातील रफिक शेख या अवलिया बरोबर दोन वर्षांपूर्वी भेट झाली आणि ती वारंवार होतच राहिली. संघर्षमय जिवनाची वादळ वाट तुडवत सध्या स्थिर स्थावर झालेले रफिक शेख म्हणजे जेऊर गावाला लाभलेले एक अनोखे रत्न आहे.निस्वार्थ समाज सेवा, व कुठल्याही कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य करणं व ते तडीस नेणं हा त्यांचा गुण त्यांना बाकीच्यांच्या तुलनेत उजवे ठरवतो.गावातील गावकी असो, भागवत कथेचे नियोजन असो, बायजामाता यात्रेचे नियोजन असो, संतुकनाथ विद्यालयाला लागणारी मदत असो किंवा पाणी फाउंडेशनला लागणारे योगदान असो, वृक्ष लागवडीसाठी पिशव्या भरणे व असो या सर्व कामात आघाडीवर असणारे रफिक शेख म्हणजे खरंच अवलीयाच आहेत.
     नाटकाच्या सादरीकरणाच्या निमित्ताने झालेली त्यांची भेट माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी ठरून गेली.दोन वर्षांपूर्वी देवी बायजामाता यात्रेनिमित्त बाळासाहेब चव्हाण लिखित "पुत्र कामेष्टी" हे दोन अंकी नाटक सादर करायचे ठरले आणि तब्बल दोन महिने तहान भूख हरपून सर्व कलाकारांकडून कसून तालमी करून घेणारे रफिक चाचा आजही तेवढीच मेहनत या नाटकांच्या तालमीसाठी घेताना दिसतात.गावातील भागवत कथेत रामायणातील सर्व पात्र प्रत्येक्षात उतरवणारे व भाविकांना मंत्र मुग्ध करून टाकणारे रफिक चाचा गावातील लहान थोरांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले आहेत.
   कधी कधी चांगल्या कामासाठी गावकीचा रोष पत्करूनही चाचा काम करत असतात. गाव एका बाजूला आणि रफिक शेख एका बाजूला अशी विषम दरी पार करून त्यांनी गावाच्या हिताची कामे केली आहेत.सध्याची परिस्थितीही काहीशा प्रमाणात अशीच आहे.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून रफिक शेख व त्यांचे अन्य मूठभर साथीदार मिळून गावासाठी पाणी आडवण्याचं व जिरवण्याचं काम करत आहेत.गावाला वारंवार मदतीचे आव्हान करूनही गावाकडून त्यांना समाधान कारक मदतीचा हात व साथ मिळताना दिसत नाही.तरी देखील रफिक चाचा मोठया जिद्दीने आणि चिकाटीने आगदी पोटात गोळा येई पर्यंत पाणी फौंडेशनसाठी आणि परिणामी गावासाठी काम करत आहेत.
  आशा या अवलीयाला माझा मानाचा मुजरा...

©शब्दांकन : राम पाटोळे(RBP)
मो.नं.7028255007.