निशब्द प्रेम...
त्या निर्जन स्थळी काळोख्या अंधारात कसलीशी कुजबूज कानावर पडली आपसूकच माझी पावले त्या आवाजाच्या दिशेने वळू लागली. मी जसजसा त्या आवाजाच्या जवळ जाऊ लागलो तसा तो आवाज जास्तच स्पष्ट जाणवू लागला. माझी पावले क्षणभर स्थिरावली आता मी एका जाग्यावर स्थिर थांबून त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो.बहुतेक माझ्या येण्याची चाहूल लागल्याने काही क्षण तो आवाज बंद झाला होता.मी पुन्हा थोडे पुढे सरकलो... आवाजाच्या दिशेने निरखून बघितले... बहुधा माझी नजर आता त्या अंधाराशी एकजीव झाली होती.त्या काळोखात ती काहीतरी शोधत होती... समोरच्या कोपऱ्यात मला कासलीसी हालचाल जाणवली.मी आता डोळे फाडून पाहू लागलो.पुन्हा पुन्हा पाहू लागलो... समोरचं दृश्य पाहून मनात चर्र झालं.एक कुत्री रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती.आणि तिचं तान्ह पिलू तिच्या सडाला(स्तनाला)चिटत होतं... त्याच्या त्या चिटण्याचा चूक.. चूक आवाज त्या अंधारात मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी क्षणभर विचार केला... काय झालं असेल बरं त्या कुत्रीला? बहुतेक अंधाराच्या त्या गर्ततेत एखाद्या सुसाट जाणाऱ्या मोटार सायकल वाल्याने त्या पिलांच्या आईचा घात केला असावा... आपली आई निवांत झोपली आहे असं समजून ते निरागस पिलू जगाची पर्वा न करता मनसोक्त स्तनपान करत होतं. त्याला उद्याची चिंता नव्हती. आज त्याची आई मेल्यानंतरही क्षणभर का होईना पण आपल्या पिलाला कुशीत घेऊन पाजत होती... लगेच माझ्या मनात विचार आला खरंच यालाच म्हणतात का आई? जी स्वतःच अस्तित्व संपवून आपल्या पिलाचं पोट भरत होती.
मी पट्कन त्या ठिकाणावरून झपझप पावलं टाकत घर जवळ केलं. घराच्या कडीला हात लागला तसा आतून आवाज आला... "थांबरे उघडते" क्षणात दार उघडलं गेलं ती आई होती...समोर खाटेवर बायको गाढ झोपली होती बहुतेक ती दमली असावी. मुलगा त्याच्या खोलीत आडवा झाला होता. माझी आई खाली फरशीवर चटई अंथरूण माझ्या वाटेकडे डोळे लावून होती. मी आईला विचारले "आगं आई मी तर आवाजही दिला नाही,आणि तरीही तुला कसं कळलं गं मीच आहे म्हणून दुसरं कुणी असतं तर"... आई हसली आणि म्हणाली "बाळा नऊ महिने या उदरात वाढवलंय तुला, हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून तासनं तास जोजवलंय... माझ्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन जोडलं गेलंय तुझ्या हृदयाशी... माझ्या बाळाची चाहूल लागताच आजही माझ्या हृदयाची स्पंदने जोराने वाढतात आणि सांगतात आई तुझं कोकरू आलं बघ". मी निशब्द होतो. फक्त हृदयातून "आई" हे दोनच शब्द बाहेर पडले.आणि मी अलगद त्या माऊलीच्या कुशीत शिरलो. "आई गं... माझी आई".
"आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी"
©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP).मो.नं.7028255007
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा