रक्ताळलेल्या जखमा...
एक भयाण सत्य.....
उन्हाळ्याचे दिवस होते.सर्वत्र नांगरट होऊन जमिनी ऊन खात पडल्या होत्या. त्या प्रचंड व अथांग जमिनीची उलथापालथ होऊन काळीशार ढेकळ माणसाच्या धडावीना मुंडक्या सारखी भासत होती.त्यातच वर्षभर तग धरून असलेली झुडपं मुळासकट उन्मळून पडली होती.उन्हाच्या धगीने अर्धवट आंबट ओल्या झुडपाच्या मुळ्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.
दुपारची वेळ सूर्य नारायण माथ्यावर आग ओकत होता. त्याच्या भयाण झळा अंगाची लाही लाही करत होत्या.अश्यातच भीमा आणि कांता डीष्कळच्या शिवारातलं ते काळशार नांगरटीचं रान तुडवत चालले होते.अंगात पैरण, पायजमा व पायात पायताण घातलेला भीमा ऐटीत चालत होता.मधेच ढेकळावरून पाय घसरून गुढग्यात लवत होता.त्याच्या पुढे काही अंतरावर चार ठिकाणी फाटलेलं धडूतं अन् सात ठिकाणी ठिगळं लावलेलं झंपर घातलेली आनवाणी कांता बिगिबिगी चालत होती. तापलेल्या ढेकळाचा चटका तळपायातून मस्तकात घुसत होता. प्रत्येक पावलागणिक तिचा जीव खालीवर खालीवर होत होता. कारण भीमा एक नंबरचा बेरकी माणूस होता. कपाळाचे बाशिंग सुटले तसे कांताला पाण्यात बघणारा भीमा... कधी रुद्र रूप धारण करेल आणि त्या महारुद्रालाही लाजवेल हे त्या शंभू महादेवालाही न उलगडणारे कोडेच होते. म्हणून कांता लगबगीने आपल्या माहेरचा उंबरा जवळ करीत होती. आणि त्यासाठी भीमाने अडवळणाची वाट निवडली होती.
कांता पुढे आणि भीमा मागे असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. दहा एकराचे नांगरटीचे उभे रान आनवाणी पायाने तुडवायचे म्हणजे कांतासाठी जीव तळहातावर घेऊन चालण्याचे ते एक दिव्यच होते.
भीमाच्या मनात मात्र एक भलताच सैतान जन्म घेत होता. झपझप पावलं टाकत चालणारी कांता प्रत्येक पावलागणिक त्याच्या छाताडावर थयथयाट करून नाच करत असल्याचा भास त्याला होत होता.आणि या विचाराने त्याचा जीव कासावीस झाला होता.त्याने कांताला आवाज दिला."कांते थांब".या शब्दाबरोबर कांताच्या मनात भीतीचा गोळा उभा राहिला. तिला दरदरून घाम फुटला. आता काय? आता आपला आवतार संपला हा पक्का विचार कांताच्या मनात घर करून गेला. तिची चाल मंदावली तसा भीमा तिच्या आंगचटीला येऊन थांबला. कांताकडे बघून निमिशभर हसला आता मात्र कांताची गाळण उडाली. त्याचे ते भेसूर हसणे म्हणजे त्याच्यातील सैतान जागा झाल्याची जणू ती सावध घंटाच होती. परंतु त्या भयाण रानात कांता काहीच करू शकत नव्हती. जे घडेल ते निमूटपणे सहन करण्याची व आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तिने आपल्या मनाची तयारी केली.
भीमा गपकन खाली वाकला. कांताला काही कळायच्या आत तिच्या पायाखालची बाभळीची एक लवचिक व मजबूत मुळी उचलून त्याने हातात घेतली. आणि कांताला फर्मान सोडलं."चल आता."
कांता पुन्हा चालू लागली. चार पाच पावलं चालली असेल नसेल तोच एक तिखट आणि सणसणीत फटका सप् दिशी तिच्या उघड्या घामेजलेल्या पाठीत बसला तशी कांता कळवळली "आय गं मेले" म्हणून जिवाच्या आकांताने ओरडली. पण तिची ती आर्त किंकाळी त्या भयाण नांगरटीच्या रानात काळ्या ढेकळात विरून गेली. पुन्हा अजुन एक फटका... फटक्यांवर फटके बसू लागले, वळावर वळ उठून अंग सुजू लागले.अंगावर उठलेल्या प्रत्येक वळावर घामाच्या धारा आपला ताबा घेऊ लागल्या.खारट घामाच्या धारा जखमेवर मीठ चोळावे तदवत कांताच्या देहाला झोंबु लागल्या अगणिक वेदनांच्या लहरी कांताच्या शरीरात संचारत होती. तिचा थरकाप होत होता. कांता आपल्या आंगावरचं चार ठिकाणी फाटलेलं धडूतं सावरत आपली लाज व आईबापाची इज्जत झाकण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती.आणि भीमा प्रत्येक फटक्या सरशी एक वेगळाच आसुरी आनंद घेत होता.आईचं घर जवळ येई पर्यंत कांताच्या देहावर गुंजभर जागा उरली नाही की जिथं तिला ती बाभळीची मुळी स्पर्शून गेली नसेल.आणि घाम झोंबला नसेल.
रक्त बंबाळ झालेली कांता कशीबशी आपल्या आईच्या अंगणात पोहोचली अन धाड्दीशी दारातच कोसळली. भीमा आंगणातल्या दगडावर ठिय्या मांडून बसला. कांताची अवस्था बघून तिच्या आईचं काळीज सोलवटुन,पिळवटून निघालं. हृदयाला न कळत पीळ बसला.आणि ती माय माऊली आपल्या त्या सासुर वाशीण हरणीला बघून कासावीस झाली. टपटप टीपं गाळू लागली. ती क्षणात तांब्याभर पाणी घेऊन आली. तसा भीमाने तांब्या पायाने लाथाडला आणि तो गरजला "मामी आवं काय रितभात हाय का न्हाई, जावई हितं बसल्याला असताना तुमी लेकीची काळजी कारायलाव व्हय? आदी माझ्या करता पाणी आणा." भीमाच्या बोलण्याने कांताची आई निशब्द झाली होती. लेकीचं हत्ती सारखं ते मूर्च्छित पडलेलं धुड बघून तिच्या हृदयात मायेचा कंप फुटला होता. अश्रुंचे उमाडे भरून आले होते. कांता म्हणून केविलवानी हाक तिच्या कंठात आडकली होती. पण भीमा पुढं तिचा काही इलाज चालत नव्हता. तिची आईची माया भिमापुढे हतबल झाली होती.
खरंच मनुष्य(पुरुष) देह इतका पाषाण हृदयी असू शकतो का? या आयुष्यभर न सुटलेल्या कांताबद्दल भीमाला काहीच आपुलकी वाटत नसावी का? कांताकडून काय चूक झाली असेल म्हणून भीमा तिला एवढ्या डागण्या देत असावा? आई जवळ असून सुद्धा आपल्या कोकराला जवळ का घेऊ शकत नव्हती? काय म्हणावे काय या नियतीला... का खेळत असेल ती असे खेळ?
मन हेलावून टाकणारे असे सत्य पुढे आल्यावर मग मन आणि मेंदू आगदी सुन्न, सुन्न आणि केवळ सुन्न होऊन जातात.
©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)
मो.नं.- 7028255007.