बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

तात्या मांग...

                            तात्या मांग...

या कथेतील सर्व पात्रे, घटना व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.
© सदर कथेचे सर्व हक्क लेखक श्री.राम भिमराव पाटोळे यांच्याकडे सुरक्षित आहेत. सदर कथा किंवा कथेचा कोणताही भाग कुठेही कोणत्याही स्वरूपात अंशतः अथवा पूर्णतः सादर करण्यापूर्वी  अथवा रुपांतरीत करण्यापूर्वी लेखकाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल. सर्व वादांसाठी न्यायालयीन कार्यक्षेत्र "अहमदनगर" असेल.

संध्याकाळी सातची वेळ... तशी रात्र व्हायला अद्याप बराच अवकाश होता. पण आमचं शेवते गांव आडवळणाच त्यामुळे एस टी गावापर्यंत पोहोचत नव्हती. हमरस्त्यापासून  अडीच तीन किलोमीटर आत असणारा गांव सरकारच्या यादीत नेहमीच दुर्लक्षित राहिला. सूर्याच्या अस्ताबरोबर मावळतीला जाणारा गाव मला पायीच गाठायचा होता.
    आज जवळपास बारा वर्षानंतर गावात पाऊल टाकायचा योग योगायोगानेच आला होता. गेल्या बारा वर्षात गावात झालेला आमूलाग्र बदल मला जवळुन अनुभवायचा होता. चौथीची केंद्र परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गाव दुरावले ते दुरावलेच. पूर्वी चौथी आणि सातवी ही केंद्र परीक्षेची वर्षे असायची, म्हणजे चार पाच जिल्हा परिषदेच्या शाळा मिळून वार्षिक परीक्षेचे एक केंद्र ठरायचे. माझ्या गावात शाळेचे मोजुन इन मीन चार वर्ग तेही चौथी पर्यंत, ते सुद्धा गावाप्रमाणेच दुर्लक्षित. त्यामुळे केंद्र परीक्षेचे केंद्र होण्याचा बहुमान माझ्या गावाला कधी मिळालाच नाही. पुढील शिक्षणासाठी शहराची किंवा तालुक्याची वाट तुडवावी लागायची. ज्यांची परिस्थिती ठीक ठाक त्यांनी बोर्डिंगला राहून शिक्षण पूर्ण करायचं आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी चौथी नंतर सरळ नांगर हातात धरायचा तो ही स्वतःची शेती असेल तर, नाहीतर दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी ठरलेली. त्यातली त्यात आमची परिस्थिती गावात उजवी, म्हणून आईने मला बोर्डिंगला न ठेवता डायरेक्ट शिकायला काका काकुंकडे मुंबईला पाठवले. काकांनाही एकच मुलगा... त्याचे नाव मोहन. तो माझ्या पेक्षा पाच वर्षांनी लहान. त्यामुळे  काकांना माझी कधीच अडचण झाली नाही. काकी सुद्धा आई सारखीच प्रेमळ आणि प्रसंगी कठोर. अशा वातावरणात मला क्वचितच आई आणि आण्णांची उणीव भासत असे. तसेही आई आण्णा दर महिना, सहा महिन्याला येऊन भेटून जायचे...
     पण का कुणास ठाऊक त्या शेवत्याच्या शिवारात माझं मन सतत घुटमळत रहायचं, कुणाची तरी आंतरिक ओढ मला आपल्याकडे खेचत आहे असा नेहमी भास व्हायचा. माझं मन नेहमी त्या शेवत्यावरून घारीप्रमाणे घिरट्या घालायचे... ते का? आणि कोणासाठी? हे मात्र मला कधीच कळले नाही.
    आता ग्रॅज्युएशन संपवून पुन्हा त्या शेवत्याच्या शिवारात शिरलो होतो. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. आता रात्रीची चाहूल सुरू झाली होती कारण याची जाण रातकीडयांनी करून द्यायला सुरुवात केली होती. रात किड्यांचा आवाज आणि त्याच्या जोडीला माझ्या पावलांचा झपझप आवाज ती रात्रीची शांतता भंग करत होते.
    अचानक गावाबाहेरच्या एक जीर्ण झोपडी समोर एक पासष्ट-सत्तर वर्षाचा म्हातारा कोणाची तरी वाट बघत उभा असल्याचा भास झाला कपाळ फडक्याने घट्ट बांधलेलं अंगावरचा सदरा ठिकठिकाणी फाटलेला धोतराचीही तीच अवस्था त्यावर डांबरासारखे काळपट डाग. त्याला पाहुन छातीत धस्स झालं. पावले मंदावली मनात शंका कुशंकांचे वादळ घोंगावु लागले. हळू हळू मी त्याच्या दिशेने चालू लागलो. मनात कसला तरी पाझर फुटावा तश्या काही भावना उचंबळून आल्या, कानशिलं तप्त झाली, हृदयाची धडधड लोहाराच्या भात्याप्रमाणे स्पष्ट ऐकू येऊ लागली, हातांना व तळपायांना न कळत कंप सुटला.
      आणि अचानक कानावर एक ओळखीचा आवाज जो ऐकण्यासाठी मी कित्येक रात्री तळमळत घालवल्या होत्या तो आदळला "मालक वाईच चा घेणार का?" माझ्या कानावर माझा विश्वासच बसेना. हातातली बॅग आपसुकच जमिनीवर पडली. मी काही बोलायच्या आधी त्या अंधारातही त्या म्हाताऱ्याला बघुन भूतकाळातल्या आठवणी झरझर डोळ्या समोरून जाऊ लागल्या. आठवणींच्या ओघात बारा वर्षाचे एक तप बाजूला सारुन मी भूतकाळाच्या डोहात केंव्हा उडी घेतली हे माझे मलाच कळले नाही.
      याच वाटेवर याच जागेवर त्या तात्याबा मांगाची मोडकी तोडकी झोपडी मला स्पष्ट दिसू लागली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला "मालक वाईच चा घेणार का?" म्हनुन नको म्हणाला तरी चहा पाजाणारा हा तात्याबा.  तात्याबाच्या हातचा चहा पेलाच नाही असे म्हणणारा व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा नातेवाईक अख्यख्या शेवत्यात शोधुन सापडणार नाही. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीबद्दल व जावयाबद्दल भरभरून बोलणारा तात्याबा बाहत्तरच्या दुष्काळाच्या आठवणीने गलबलून जायचा. याच दुष्काळाने हिरावुन घेतलेल्या बायकोची आणि अडीच वर्षाच्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ व्हायचा.
      तात्याबा गावात प्रत्येकाच्या घरचं पडेल ते काम करून मिळेल ती भाकरी खाऊन, आपल्या त्या मोडक्या झोपडीला ताजमहाल समजुन आदबीने दिवस कंठीत होता. दूर कुठल्याशा गावात आपली मुलगी तिच्या जन्मापासून आंधळ्या असणाऱ्या नवऱ्याच्या घरी भीक मागुन राजा राणीच्या संसारात सुखाने नांदत आहे ही त्याची भाबडी समजुत होती.
       गावात कुणाच्या घरी लग्न कार्य असेल तर लाकडं फोडायचा आणि उष्ट्या पत्रावळी उचलण्याचा मान फक्त तात्याबाचाच. कामाच्या बदल्यात पैसे... हे व्यवहारचं गणित तात्याबाला कधी जमलंच नाही. काम झाल्यावर शेरभर साखर आणि चिपटंभर चहापत्ती ही त्याची हक्काची बिदागी. "एक वेळ लग्नात न जेवता काम करेल पण साखर आणि चहापत्ती घेतल्याशिवाय लगीन घर सोडाणार नाही." हा त्याने स्वतःसाठी स्वतःच घालुन घेतलेला पायंडा तो कधीच मोडत नव्हता. "जगण्यासाठी भाकर आणि चहा साठी साखर" हे एवढंच त्याला ठाऊक होतं. "मालक वाईच चा घेणार का?" म्हणून प्रत्येकाला आवर्जून आपल्या झोपडीत घेऊन जाणाऱ्या तात्याबाचा... मांग असुन सुद्धा कधीच कुणाला विटाळ झाला नाही. चुलीचा जाळ फुंकत चिंगीचा संसार गाडा सुखात चाललाय... जावई दिवसाकाठी पाच सा रुपये कमावतोय म्हणून तोंडभर कौतुक करायचा. आणि शेवटी दुष्काळात दुरावलेल्या आपल्या माणसांची आठवण काढुन डोळ्यात तरळलेले अश्रु धुरामुळे आलेत म्हणून धोतराच्या सोग्यात तोंड लपवायचा.
      तात्याबाचा माझ्यावर खासा जीव. सकाळी टोपलं घेऊन गावात भाकरी मागायला आला की अर्धा तास तरी आमच्या ओसरीवरचा हलायचा नाही. माझ्या सोबत गप्पा मारायचा. पण यावेळी त्याच्या गप्पांचा विषय एकदम वेगळा असायचा."काय मालक काल त्या कुळकर्णी मास्तरानं शाळत लय धिंगाणा घातला म्हणं"  "मास्तरांनी नाही ओ तात्या त्यांच्या वर्गातल्या मुलांनी धिंगाणा घातला." "ह्या त्याच्या आयला अमास्नी काय कळतंय डोंबलं?  ते परटाचं पोर म्हणत होतं शाळत धिंगाणा झाला, म्हणुन मला वाटलं परतेक टायमाला पोरं धिंगाणा घालत्यात एखाद टायमाला मास्तरांनी घातला म्हणून कुठं बिघडलं."  स्वतःच्याच बोलण्यावर स्वतःच मोठयाने फिदी फिदी हसायचा. मग हळुच सांगायचा... " मालक हिकडं या, त्या गणू पाटलाची बोर लदाडून गेलीय, काल गुराक्याच्या पोरांनी लय झोडपली म्हनं." बस एवढी बातमी माझ्यासाठी ब्रेकिंग न्यूज असायची. दुपारी शाळा सुटली की आमची वानर सेना थेट तात्याच्या झोपडीवर जाऊन धडकायची. त्याच्या हातचा चहा प्यायचा आणि पुढं पाटलाच्या बोरीच्या दिशेनं आगेकूच करायची. तात्या बातमी देताना जर कधी चुकून आई बाहेर आली तर ती त्याला चिडून बोलायची. "तात्या तुमच्या मुळं  वाया गेलाय तो. घरात पाय म्हणून कधी नसतोच त्याचा, कधी पाटलाच्या बोरीवर, कधी पांदीतल्या चिंचेवर, तर कधी भोसल्याच्या उसात, तरी बरं सोनाराची आमराई वांझ आहे म्हणून नाहीतर अख्खा उन्हाळा तिथंच धुडगुस घातला असता." "आहो वैनी असुदया की... खेळायचं, बागडायचं वय त्यांचं. आता ह्या वयात त्यांनी उनाडक्या नाही करायच्या तर काय आपुन करायच्या व्हय." पुन्हा फिदी फिदी हसायचा. आई त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आत जाऊन ऊनऊन भाकर आणि आंब्याचा खार आणुन त्याच्या टोपल्यात टाकायची. मला आठवते आख्या गावात भाकरी मागणाऱ्या तात्याला फक्त आमच्याच घरी ताजी भाकर मिळायची. त्या भाकरीचे आणि आईचे कौतुक करताना त्याचे डोळे भरून यायचे... जाताना पुन्हा मला आज कुठल्या कामगिरीवर जायचं याची आठवण करून द्यायचा.
        चौथीची केंद्र परीक्षा पहिल्या नंबरने पास झालो. त्यावेळी एक आख्खा पेढा त्याच्या तोंडात कोंबल्याचं आजही मला आठवते. त्यादिवशी मात्र त्याने आपले अश्रु लपवले नाहीत."मालक लय मोठ्ठ व्हा... आई बापाचं नाव कमवा, अन् जमलंच तर ह्या म्हाताऱ्याला इसरु नका." हे बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता.
        मुंबईला जाणार म्हणून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दिवाळ सुट्टीत काकांकडे गेल्यावर केलेली धम्माल आठवली की मन मोहरून जायचे. मी मुंबईला जाताना माझ्या वाटेकडे डोळे लावुन उन्हात दोन पायावर बसलेला तात्या मला आजही आठवतो. मी जवळ येताच सर्व बंधने जुगारून त्याने मला कडकडून मिठी मारली. "मालक आपली भेट आता ह्या जन्मात नाही व्हायची." मी "तात्या असं का बोलताय." "आवं माझं काय पिकलं पान कवा बी गळुन पडणार, आमच्या गवऱ्या मसन वट्यात कवाच पोहोचल्या... बरं ती जावद्या, "मालक वाईच चा घेणार का?" मी काही बोलायच्या आधी आण्णा बोलते झाले."आरे तात्या ऊन वर चढायच्या आधी नाक्यावर पोहोचायला पाहिजे, नाहीतर गाडी चुकेल." " ह्या त्याच्या त्याला काय व्हतंय लगीच टाकतो, पुन्यानंदा भेट व्हतीय का नाय परमेश्वरालाच माहीत." अण्णा "हे बघ तात्या हवंतर साखर पाणी दे पटकन." तात्या "म्हंजी चा नकोच म्हणता?... बरं साखर पाणी तर साखर पाणी." झोपडीत शिरला क्षणार्धात अल्युमिनियमच्या जुनाट फुटक्या ताटात साखर आणि स्टीलच्या चेपलेल्या तांब्यात पाणी घेऊन आला. मी त्यातली मूठभर साखर खाल्ली आणि दोनघोट पाणी पिलो. तात्यांचा निरोप घेतला. त्याच्या कंठातील दाटलेला हुंदका आणि डबडबले डोळे आजही मला त्याच्या निरागस, निरामय, निर्भेळ प्रेमाची साक्ष देत आहेत. ज्यांनी माझ्यावर जीव ओवाळुन टाकला त्या आई, आण्णा, काका, काकू आणि मोनू नंतर हा एकमेव जिवा भावाचा माणूस. गावाने गावकुसाबाहेर टाकलेला पण प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा तात्याबा मांग.
      आज इतक्या वर्षानंतर त्या समोर असलेल्या तात्याला कडकडून मिठी मारावी असा मनात विचार आला, आणि मनातच विरून गेला. का कुणास ठाऊक पण माझे धाडस झाले नाही. मनात दाटलेला हुंदका आवरून मी त्याला विचारले. "तात्या तुम्ही मला ओखलंत?" झोपडीच्या दारातून आत शिरताना जरासा हसला, पण ते हसणे फिदीफिदी नव्हते. त्याचे हसणे मला खूप केविलवाणे भासले. "मालक गाई पासुन वासरू अन् आई पासुन लेकरु कितीही लांब गेलं तरी तिचं वात्सल्य आटत नसतं... ह्यो म्हातारा अजुन भरमिस्ट नाय झाला. कोली कुत्री बी आपलं कोण अन परकं कोण हे वळखत्यात,मी तर माणुस हाय." आज तात्याचे शब्द मला एखाद्या फिलॉसॉफी सारखे वाटत होते. त्याच्या पाठोपाठ मीही झोपडीत शिरलो. सर्वत्र नजर फिरवली इतक्या वर्षात त्याच्या झोपडीत किंचितही बदल झाला नव्हता. प्रत्येक वस्तू पूर्वी होती त्याच ठिकाणी जशीच्या तशी होती. चुलीवर चहा उकळत होता."तात्या आगोदरच चहा ठेवला होतात का?" "व्हय मालक पुन्यानंदा तुम्हाला उशीर व्हया नकं... लांबचा पल्ला गाठायचा हाय तुम्हाला." त्याच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला नाही.
    ज्या अल्युमिनियमच्या ताटात त्याने मला मुंबईला जाताना साखर दिली होती त्याच ताटात चहा ओतून माझ्याकडे सरकवला. त्याच्या आधी पाणी द्यायला विसरला नाही. मी चहा पीत असताना त्याची नजर एक टक माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. बहुधा तो माझ्या आणि परिणामी त्याच्याही भुतकाळाचा शोध घेत असावा असा मी मनाशीच अंदाज बांधला. माझा चहा संपला मी ताट खाली ठेवले... तसा तो माझ्याकडे सरकला."मालक इकडं या, सोनाराच्या आमराईत पाड लय जोरात लागलाय... काल पसा आणायला गेलतो तवा ध्यान गेलं." मी काहीच बोललो नाही उठून बाहेर आलो. तो आतच होता. मी बाहेर पडलेली बॅग उचलली आणि वाड्याच्या दिशेने पुन्हा झपझप पावलं टाकत निघालो.
     रात्रीचे आठ वाजले होते. गाव काळोखाच्या गर्ततेत निपचित पडला होता. भयाण वादळापूर्वीची बीभत्स शांतता असल्याचा भास होत होता. रातकिड्यांच्या सोबतीला आता वस्त्यांवरच्या कुत्र्यांच्या भुंकण्याची भर पडली होती. जोडीला माझ्या चालण्याचा झपझप आवाज होताच. गेल्या बारा वर्षात गावाचा बराच कायापालट झाला होता. सिमेंटच्या जंगलाने इथेही बऱ्या पैकी हात पाय पसरायला सुरुवात केल्याच्या खुणा त्या हायमॅक्सच्या लख्ख प्रकाशात दिसत होत्या... पण असे असूनही तात्या मांगाने आपल्या झोपडीचा बाज कायम ठेवल्याचे आत्मिक समाधानही वाटत होते. तात्याला भेटल्यापासून माझ्या मनातील ती कुणाच्या तरी भेटीची आंतरिक ओढ आता कमी झाल्याचा भास मला होत होता. अगदी हलके हलके वाटत होते.
      रात्री हातपाय धुवून जेवायला बसलो, आणि सहजच आठवण म्हणून आईला म्हणालो "आई सकाळी मला लवकर उठाव." त्यावर आई म्हणाली "दिवसभर प्रवासाने दमला असशील उठ निवांत." "नाही आई, मला उद्या सोनाराच्या आमराईत पाडावर डल्ला मारायला जायचंय." आई जरासी गोंधळली तिने मला पुन्हा विचारले "कुठं जायचंय?" मी "सोनाराच्या आमराईत" आईच्या गोंधळाचे रूपांतर आता भीतीत झाले."तुला कुणी सांगितले सोनाराच्या आमराईने पाड धरला म्हणून." एव्हाना माझे जेवण झाले आणि मी हात धुवत म्हणालो..."असं काय करतेस आई, तुला माहीत आहे ना आख्ख्या गावात आपला फक्त एकच खबऱ्या आहे... तो म्हणजे तात्या." आई अधिकच घाबरली तिने आण्णांना आवाज दिला."आहो ऐकलं का?... आत या जरा." बाहेर सुपारी कात्रत बसलेले आण्णा लगबगीने आत आले. "काय झालं सुमा." आई "याला तात्याबा  दिसला म्हणतोय हा." आण्णा माझ्याकडे बघून जरासे हसले. "ह्या, भास झाला असेल त्याला." त्या दोघांमध्ये काय संभाषण चाललेय हे मला काहीच समजत नव्हते, म्हणून न राहुन मी त्यांना विचारले."आई... आण्णा तुमचं नेमकं काय चाललय मला समजेल असे बोला." आण्णा "तात्या मांगाला मरून दहा आकारा वर्षे उलटुन गेली भाऊराव... त्यामुळे तो तुला भेटला हा केवळ भासच." मी  "हे कसं शक्य आहे आण्णा, आहो आता येताना त्याने मला चहा करून पाजला." आण्णा "कुठं पाण्याच्या टाकीवर का?." मी " आहो असं काय बोलताय आण्णा... त्याच्या झोपडीत." आण्णा "तुला चष्मा वगैरे लागलाय असं वाटतंय मला, डोळे तपासून घे एकदा? आरे त्याच्या झोपडीच्या जाग्यावरच पाण्याची टाकी बांधली ग्रामपंचायतीने, येताना तुला दिसली नाही का?" मी "आई ही सर्व काय भानगड आहे? प्लिज आई मला सांगशील का?" पुढे आईने जे सांगितले ते ऐकून मी कोसळायचाच बाकी होतो.
       मी मुंबईला गेल्यानंतर तात्या रोज तासन तास आमच्या ओसरीवर बसून असायचा. काहीच बोलायचा नाही. अंधार पडू लागला की न सांगता त्याच्या खोपटाकडे जायचा. परत सकाळी आमच्या ओसरीला दत्त म्हणून हजर... आई देईल ते खायचा. मागत कधीच नव्हता... असं रोज दारात बसलेला बघून आण्णा त्याला खवळले. आता "परत येणार नाय जी" असं म्हणून हात जोडुन निघुन गेला. चार पाच दिवस वाड्याकडे फिरकलाच नाही. पाचव्या दिवशी दुपारच्या वेळी रडत ओरडत आला."मालक... ओ मालक, माझ्या चिंगीला अन् तिच्या मालकाला गाडीनं उडवलं, जाग्याव चेंदामेंदा झाला दोघांचा... वैनी संपलं सगळं... सगळं संपलं." असं म्हणत भ्रमिष्टा सारखा पळत सुटला. भेटेल त्याला सांगायचा "चेंदामेंदा झाला दोघांचा, संपलं सगळं... सगळं संपलं." चिंगीच्या धक्क्यातून तो सावरला नाही तो नाहीच. एक दिवस गुराखी पोरांनी गावात बोंब ठोकली, सोनाराच्या आमराईत वेडा तात्याबा मरून पडला म्हणून. हे ऐकून आई आणि आण्णा अस्वस्थ झाले, धावत आमराईत गेले. अख्ख्या गाव गोळा झाला होता. भ्रमिष्ट अवस्थेत रात्रीच्या अंधारात तात्या आमराईच्या झाडावर डोकं आपटून गतप्राण झाला होता. कपाळ फुटल्यामुळे चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता.  रात्रीच्या अंधारात रक्ताच्या वासाने कोल्ह्या कुत्र्यांनी अंगाचे लचके तोडले होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चार दिवसांपूर्वी सोनाराच्या कारभारणीने नको म्हणत असताना शेरभर जोंधळे दिले होते ते तसेच धोतराच्या ऐका बाजूला बांधलेले होते. त्या दिवशी  तात्याबाची केविलवाणी दशा बघून आख्ख्या गाव हमसून हमसून रडला रडला होता. कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न ठेवणारा, लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना तोंडभरून मालक म्हणणारा, कधीच कुणाला तुझ्या आयला म्हणून रागाने शिवी न घालणारा, आग्रहाने चहा प्यायला लावणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा तात्या आज सर्वांना रडवुन गेला होता. त्याचा अंतविधी आण्णांनी स्वतः केला. तात्याच्या पिंडाला कावळा काही शिवला नाही. काही तरी इच्छा आपुरी राहिली असावी. असा तर्क वितर्क काढत गावकरी आपापल्या घरी निघून गेले...
     या घटने नंतर घडून  एक  विलक्षण गोष्ट त्या आमराईत घडली. वर्षानुवर्षे वांज असलेली सोनाराची आमराई त्या वर्षीपासून आंब्यानी भरून जाऊ लागली. पानं कमी आणि फळं जास्त अशी अवस्था आमराईची होत होती. पण झाडाची एक कैरी तोडायची म्हणले, तरी स्वतः सोनाराच्या अंगावर बोटभर काटा उभा रहायचा. सर्व पाड गळून आख्ख्या आमराईत सडा व्हायचा. गावभर आंब्याचा घमघमाट पसरायचा. टारगट गुराख्याची पोरं "वेड्या तात्याची आमराई" म्हणून आमराईच्या आसपासही फिरकत नसत. गेल्या आकारा वर्षात तात्या कधी कुणाला दिसला नाही की कधी कुणाच्या स्वप्नातही आला नाही. पण त्या आमराईत त्याची दहशत पसरली ती पसरलीच.
   हे सर्व सांगत असताना आईचे आणि माझे उर भरून आले. डोळ्यात गंगा जमुना तरळू लागल्या. गहिवरल्या शब्दात मी आईला विचारले "मग तो मला कसा दिसला." आई हसून म्हणाली "एखाद्या माणसाचा आपल्यावर खूप जीव असला की तो मेल्यावरही आपल्या भेटीला येतो. तुझ्यात जीव गुंतला होता त्याचा, तु मुंबईला जाताना त्याच्या हातचा चहा पेला नाहीस म्हणून त्याने त्या दिवसापासून मरेपर्यंत कुणाला 'मालक वाईच चा घेता का?' म्हणून विचारलं नाही. तुला त्याच्या हातचा शेवटचा चहा पाजुन त्याचा आत्मा आता शांत... शांत झाला असेल."
   आईने सांगितलेल्या सर्व गोष्टी आता पटायला लागल्या होत्या. तात्याचे ते बांधलेले कपाळ म्हणजे माझ्यापासून जखमेच्या खुणा लपवायचा प्रयत्नच होता , ठिकठिकाणी फाटलेला सदरा व धोतर त्यावर ते काळपट डाग, त्याचे ते भ्रमिष्ट झालो नाही म्हणून सांगणे, सोनाराच्या मळ्यातला पसा, सोनाराच्या आमराईत पाड लय जोरात लागलाय हे सारं आठवलं की आजही अंगावर बोटभर काटा उभा राहतो.
    खरंच तात्याबाचं माझ्याशी काही नातं नसताना सुद्धा तो आभासी का होईना पण मरून पुन्हा जिवंत झाला. या उलट आजच्या या प्रगत टेक्नॉलॉजीच्या आभासी दुनियेत सर्व नाती जिवंत असुन सुद्धा मृत अवस्थेत आहेत. आणि तीही कधीच जिवंत न होण्यासाठी.

बुधवार, २७ जून, २०१८

किस्सा...

पारनेर-नगर एसटी मधील एक मनाला भिडलेला किस्सा... एकदा वाचाच...

दिनांक १९ जून २०१८ ची घटना आहे.दुपारी दीड वाजताच्या पारनेर(सुपा मार्गे) नगर एस टी गाडीने नगरला येत होतो. गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती.गाडी केडगावच्या जवळ आली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले.गाडी थांबली गाडीत चार पाच इसम चढले. ते एसटीचे अधिकारी होते त्यांनी प्रवाश्यांची तिकिटे चेक करायला सुरुवात केली.सर्व प्रवाश्यांनी पटापट तिकिटे काढून दाखवली.त्यातील एक अधिकारी माझ्या सीटजवळ आला मीही तिकीट दाखवले.त्यांनी माझ्या बाजूच्या व्यक्तीला तिकीट म्हणून विचारले. बाजूचा व्यक्ती इन शर्ट केलेला. पायात छान बूट असलेला एक रुबाबदार तरुण होता.त्यांनी तिकीट विचारताच तो तरुण स्टाफ म्हणाला आणि गप्पा झाला.अधिकाऱ्याने त्या तरुणाला वरपासून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळला व स्लिप दाखव म्हणाला. तरुणाने स्लिप दाखवली.स्लिप बघून त्या अधिकाऱ्याला काय खटले काय माहीत.तो म्हणाला काय जहागिरदाराची औलाद आहे का? बापाची गाडी असल्यासारखा फिरतो? आम्ही आल्यावर साधं उठून उभा राहता येत नाही का? असे म्हणून सर्व प्रवाश्यांसमोर आपल्याच स्टाफचा असा आगे तुगे बोलून अपमान करणारा अधिकारी मी पहिल्यांदा पहिला.एवढ्या लोकांत अपमान होत असून सुद्धा त्या तरुणाने पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून त्या अधिकाऱ्यांची माफी मागितली.परंतु अधिकाऱ्याने आपली मुजोरीची भाषा तशीच सुरू ठेवली. त्या कर्मचाऱ्याला कार्यवाहीची धमकी देऊन त्याच्या स्लीपवरील नाव लिहून नेले.व तणतणत निघून गेला.
      मी विचार करू लागलो की त्या तरुणाचे नेमके काय चुकले असावे बरे म्हणून एवढा अपमान होऊनही त्यानेच माफी मागितली.म्हणजे आजही वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव प्रत्येक क्षेत्रात आहे.आजही वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ कर्मचाऱ्याला गुलाम म्हणूनच वागवतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी त्या तरुणाला त्याचे नाव विचारले त्याने अतिशय नम्रपणे आपले नाव सांगितले. बहुधा तो ड्युटी संपवून घरी निघाला असावा.त्या अधिकाऱ्याचेही नाव मी जाणून घेतले.
अधिकाऱ्याचे नाव : सुभाष गवळी
तरुणाचे नाव : पारनेर डेपो मध्ये कंडक्टर असलेले अभिमान गायकवाड होय.

बघा यातलं कुणी तुमच्यात ओळखीचं आहे काय किंवा तुम्हीही त्या एसटीचे प्रत्यक्षदर्शी प्रवासी आहात काय.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)

मो.नं.7028255007.